India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्व कौशल्य दाखवले अन् ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली.
मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संगाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वांनी कौतुक केलं. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तेंडुलकर म्हणाला,''विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठं यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियानं दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक.''