India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या दमदार खेळानंतर टीम इंडिया मोठी आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाची कोंडी करेल असे वाटले होते. पण, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. कर्णधार अजिंक्यच्या शतकी खेळीनं टीम इंडियाला सावरले, पण तो दुर्दैवी धावबाद झाला. अजिंक्यच्या या विकेटवरून आता नवा वाद निर्माण होऊ लागला आहे. तिसरे पंच सायमन टॉफल हे दुजाभाव करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्यनं १०४ धावांवरून पुढे खेळ करताना मोठ्या खेळीची आस दाखवली. त्याच्यात तो आत्मविश्वासही दिसत होता. पण. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला माघारी जावं लागलं. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जडेजानं शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि अर्धशतकीय धावेसाठी अजिंक्यला कॉल दिला. अजिंक्यनेही त्वरीत प्रतिसाद देताना धाव घेतली, पण मार्नस लाबुशेननं चेंडू यष्टिरक्षक टीम पेनकडे दिला. थोडक्यात अजिंक्य धावबाद झाला. अजिंक्यच्या या कृतीनं पुन्हा एकदा त्याच्यातला खरा कर्णधार अनुभवायला मिळाला. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतानं पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली.