India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. ८व्या षटकात मैदान सोडणाऱ्या उमेश यादव ( Umesh Yadav) च्या दुखापतीबाबत BCCIनं अपडेट दिले आहेत उमेशला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स ( ४) यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बर्न्सनं या निर्णयाविरोधात DRS घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ८व्या षटकात उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले. BCCIची वैद्यकिय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष देऊन आहे आणि त्याला स्कॅनसाठी नेण्यात येणार आहेत.