भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघामध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या दोन दिग्गज खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यामधून वगळण्याची मागणी होत आहे.
पहिल्या कसोटीमध्ये फिरकील अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा सर्वात सिनियर खेळाडू नाथन लायन अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर करून निवृत्ती देण्याची मागणी होत आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी फॉक्स क्रिकेटने लिहिले की, ३५ वर्षांच्या नाथन लायनचे दिवस आता भरले आहेत. आता केवळ काही काळ तो ऑस्ट्रेलियन संघामध्ये राहू शकतो. शेन वॉर्न ३७ व्या वर्षापर्यंत खेळला होता. तर स्टुअर्ट मॅकगिलसुद्धा एवढीच वर्षे खेळला होता.
नाथन लायन नागपूरच्या खेळपट्टीवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळेच आता त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नागपूर कसोटीमध्ये नाथन लायनने १२६ धावा देत केवळ १ बळी टिपला होता. नाथन लायनने ऑस्ट्रेलियाकडून ११६ कसोटी सामन्यांमध्ये ४६१ बळी टिपले आहेत.
त्यामुळे दिल्ली कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ मोठे बदल करू शकतो. संघातील सिनियर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे अंतिम ११ मधील स्थान संकटात सापडले आहे. कारण नागपूर कसोटीत वॉर्नर अपयशी ठरला. तसेच त्याचा भारताविरुद्धचा आधीचा रेकॉर्डही तितकासा चांगला नाही आहे. असा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ डेव्हिड वॉर्नरच्या जागी ट्रॅव्हिस हेडला संघात घेण्याचा विचार करू शकते.
डेव्हिड वॉर्नरने नागपूर कसोटीमध्ये दोन्ही डावांत मिळून केवळ ११ धावा काढल्या होत्या. तसेच भारतामध्ये वॉर्नरचा रेकॉर्ड पाहिल्यास ९ कसोटी सामन्यांमध्ये मिळून त्याला ३९९ धावाच काढता आलेल्या आहेत. त्यामुळे वॉर्नरचे ऑस्ट्रेलियन संघातील स्थान डळमळीत झाले आहे.