India vs Australia 2nd Test : २०१८-१९चा दौऱ्यातील ऐतिहासिक विजयानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिकेतील सुरुवातीलाच धक्का बसला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला आणि या लाजीरवाण्या कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचे मनोबल खचले आहे. या कसोटीनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतणार आहेत. पण, मायदेशात परतण्यापूर्वी विराट टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी विशेष शाळा भरवणार आहे.
गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) यानेही दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्यानं टीम इंडियाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी विराट विशेष मीटिंग घेणार आहे. आज ही मीटिंग होणार आहे आणि त्यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी पुढाकार घेतला आहे. संघातील खेळांडूसोबतच्या मीटिंगनंतर विराट प्रत्येक खेळाडूसोबत काही काळ घालवणार आहे. त्यात तो प्रत्येक सदस्याचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. या सत्रात विराट खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहे.
''आम्ही एक सामना गमावला आहे, परंतु अजूनही ३ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे विराट प्रत्येक खेळाडूंशी एकत्रितरित्या आणि वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहे. या प्रयत्नानं खेळाडूंमध्ये पुन्हा उत्साह निर्माण होईल,''असेही संघ व्यवस्थापनातील सुत्रांनी सांगितले. विराटच्या अनुपस्थितीत पुढील तीन कसोटींमध्ये अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. त्यामुळे रहाणेही खेळाडूंसोबत या सत्रात चर्चा करणार आहे. विराट मायदेशात परतणार असला तरी तो संघाच्या सतत संपर्कात राहणार आहे.
दुसऱ्या कसोटीत संघात होतील चार बदल?
पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. सहाच्या जागी रिषभ पंतचा पर्याय आहे, पण सहालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल.
दुसऱ्या कसोटीतील Playing XI - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज.