मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहली माघारी परतल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं जबाबदारीनं खेळ केला. त्याने धावांची गती आणि शिल्लक चेंडू यांच्यातील समन्वय राखताना भारताला विजयाच्या दिशेने कूच करून दिले. धोनीने मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी करताना एक विक्रम नावावर केला. त्याचे हे ऑस्ट्रेलियातील सलग तिसरे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह धोनीने वन डे सामन्यात सलग तीन अर्धशतक करण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा नावावर केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेत धोनीनं 96 चेंडूंत 51 धावा केल्या होत्या. मात्र, त्या सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे धोनीच्या संथ खेळीवर टीकाकारांनी जोरदार हल्ला चढवला. धोनीने मात्र त्यांना आपल्या खेळीतून सडेतोड उत्तर दिले., त्याने सिडनीतील वन डे सामन्यात नाबाद 55 धावा करताला संघाला विजय मिळवून दिला आणि भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली.
शुक्रवारी धोनीने आणखी एक अर्धशतक झळकावताना संघाला विजयासमीप नेले. त्याने जवळपास 70च्या सरासरीने अर्धशतक पूर्ण केले. सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची ही तिसरी वेळ. याआधी त्याने 2011 मध्ये इंग्लंड दौऱ्यात आणि 2014 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात यजमानांविरुद्ध अशी कामगिरी केली होती.