मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : वन डे मालिका विजयासाठी महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. त्यामुळे भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवताला. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांना अवघ्या 27 धावांवर माघारी पाठवले. अॅलेक्स करी ( 5 ) आणि अॅरोन फिंच ( 14 ) यांना पुन्हा अपयश आले. भुवनेश्वर कुमारने दोघांनाही माघारी पाठवले. ऑसी कर्णधार फिंचचे आपल्या शैलीत बदल करून खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, परंतु भुवीच्या आयडियाच्या कल्पनेसमोर तो अपयशी ठरला.
या मालिकेत भारताला तिन्ही सामन्यांत भुवनेश्वर कुमारने पहिली विकेट मिळवून दिली आहे. फिंचला भुवीच्या गोलंदाजीवर खेळताना चाचपडावे लागले आहे. पण, मेलबर्न वन डे सामन्यात फिंचने भुवीच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी वेगळी रणनीती आखली. तो क्रिजपासून दोन पाऊलं पुढे उभे राहुन फलंदाजी करत होता. त्याला रोखण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्टम्पजवळ येत यष्टिरक्षण करू लागला. त्यामुळे फिंचला क्रिजवरूनच बॅटींग करणे भाग पडले. परंतु, धोनी पुन्हा मागे गेला आणि फिंचने तिच रणनीती अवलंबविली. मग फिंचला रोखण्यासाठी भुवीने एक शक्कल लढवली. त्याने अंपायरच्या मागून चेंडू टाकला. त्याच्या या गोलंदाजीवर फिंचलाही अचंबित केले. पंचांनी तो चेंडू अवैध ठरवला.