मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात नवा अध्याय लिहीला. महेंद्रसिंग धोनीने जबाबदारीने खेळ करताना भारताला विजय मिळवून दिला. 37 वर्षीय धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत 193 धावा केल्या आणि या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दी सीरिज पुरस्काराने गौरविण्यात आले. धोनीने तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीन अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. तब्बल 8 वर्षांनंतर धोनीने मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार पटकावला आहे.
सिडनीत त्याने 96 चेंडूंत 51 धावा केल्या होत्या. मात्र, त्या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाला धोनीची संथ खेळी कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. ॲडलेड वन डे मध्ये त्याने नाबाद 55 धावा करताना भारताला 6 विकेट राखून विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताला मालिकेतील आव्हान कायम राखता आले. मेलबर्नवरील अखेरच्या सामन्यातही धोनीने नाबाद 87 धावांची खेळी केली. भारताचे आव्वल तीन फलंदाज अर्धशतक करण्यात अपयशी ठरले. धोनी आणि केदार जाधव ( नाबाद 61) यांनी चौथ्या विकेटसाठी 121 धावांची केली. भारताने हा सामना 7 विकेट राखून जिंकताना मालिका 2-1 अशी खिशात घातली.
या ऐतिहासिक विजयानंतर धोनीला 8 वर्षांनंतर वन डे मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने 2011मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅच ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकला होता. धोनीचा हा वन डेतील सातवा मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार आहे.