ठळक मुद्देऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा पहिला भारतीय फिरकीपटूअजित आगरकरच्या विक्रमाशी बरोबरी
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर एकदम कडssssक परफॉर्मन्स दिला. त्याच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. चहलने 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 230 धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेणारा तो भारताचा पहिला फिरकीपटू ठरला. त्याने या कामगिरीसह रवी शास्त्री यांचा 1991 सालचा विक्रमही मोडला. दक्षिण आफ्रिकानंतर ऑस्ट्रेलियातही आपल्या कामगिरीच्या जोरावर चहलने सोशल मीडियावर वाह वाह मिळवली. चहलने एका षटकात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श ही सेट जोडी फोडली. त्याने एकाच षटकात या दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर त्याने पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, झाय रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेत सहा विकेट घेणारा चहल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. मुरली कार्तिकने 2007 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 27 अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 2004 मध्ये आगरकरने ( 6/42) आणि आज चहलने ( 6/42) यांनी अशी कामगिरी केली. वन डे आणि ट्वेंटी -20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा विकेट घेणारा चहल हा श्रीलंकेच्या अजंटा मेंडिसनंतरचा दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद चहलच्या नाववर झाली आहे. त्याने 42 धावांत 6 विकेट घेतल्या आहेत. याआधी हा विक्रम शास्त्रींच्या ( 5/15, 1991) नावावर होता. पाकिस्तानचा साकलेन मुश्ताक ( 5/29) आणि अब्दुल कादरी ( 5/53) यांनीही ऑस्ट्रेलियात पाच विकेट घेतल्या आहेत. 2018 मध्ये चहलने दक्षिण आफ्रिकेत पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फिरकीपटू होता. ऑस्ट्रेलियातही सहा विकेट घेणारा चहल हा पहिला फिरकीपटू ठरला आहे. चहलची ही कामगिरी भारतीय गोलंदाजाने नोंदवलेली सातवी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.