मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या 230 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा ( 9) आणि शिखर धवन ( 23) यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. मात्र, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांनी संयमी खेळी करून संघाला सावरले. या दोघांना प्रत्येकी दोन जीवदान मिळाले आणि त्यानंतर यांनी सावध पवित्रा घेतला. या सामन्यात धोनीनं 34वी धाव घेताच एका विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियात असा विक्रम करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दमदार परफॉर्मन्स दिला. त्याच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. चहलने 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 230 धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेणारा तो भारताचा पहिला फिरकीपटू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या पीटर हँड्सकोम्बने (58) खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सहकाऱ्यांकडून हवीतशी साथ मिळाली नाही. उस्मान ख्वाजा ( 34) आणि शॉन मार्श ( 39) यांचे एकाच षटकात बाद होणे हे भारतासाठी खूपच फलदायी ठरले.
रोहित व धवन बाद झाल्यानंतर धोनी व कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. धोनीने 34वी धाव घेत ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यांत 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तौ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने कोहलीला मागे टाकले.