मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यात बाकावर बसलेल्या युजवेंद्र चहलने तिसऱ्या सामन्यात कमाल केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवताना मेलबर्नवर विक्रमांची रांग लावली. चहलने 10 षटकांत 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि मेलबर्नवर भारतीय गोलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याशिवाय त्याने अजित आगरकरच्या ( 6/42) विक्रमाचीही बरोबरी केली. पण, या पलिकडे त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावावर असलेला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेत सहा विकेट घेणारा चहल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. मुरली कार्तिकने 2007 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 27 अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 2004 मध्ये आगरकरने ( 6/42) आणि आज चहलने ( 6/42) यांनी अशी कामगिरी केली. वन डे आणि ट्वेंटी -20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा विकेट घेणारा चहल हा श्रीलंकेच्या अजंटा मेंडिसनंतरचा दुसरा गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. रिचर्डसनची विकेट घेत त्याने रवी शास्त्रींच्या विक्रमाची बरोबरी केली. 1991 मध्ये शास्त्रींनी पाच विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेणारे ते पहिले भारतीय फिरकीपटू होते. त्यानंतर हा पराक्रम चहलने केला. मात्र, 27 वर्षांनंतर शास्त्रींच्या विक्रमाशी बरोबरी करण्यावर चहलने समाधान मानले नाही. त्याने आणखी एक विकेट घेत शास्त्रींना मागे टाकले.