India vs Australia, 3rd T20I : तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा दम दाखवला. मॅथ्यू वेड व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मोठा पल्ला गाठला. भारतीय खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. मॅक्सवेलला दिलेले जीवदान संघाला मारक ठरले. त्यात या सामन्यात एक नाट्यमय प्रसंग घडला. मॅथ्यू वेड बाद असल्याचे स्पष्ट दिसूनही पंचांनी टीम इंडियाला DRS घेऊ दिला नाही. त्यामुळे विराट कोहलीचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
आजच्या सामन्यात अॅरोन फिंचचे पुनरागमन झाले, परंतु वॉशिंग्टन सुंदरनं त्याला भोपळाही फोडू न देता दुसऱ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. मॅथ्यू वेड व स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांची ६५ धावांची भागीदारी सुंदरनं तोडली. १०व्या षटकात स्मिथ २४ धावांवर माघारी परतला. पहिल्या दहा षटकांत सुंदरनं ४ षटके फेकली आणि ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
वेड व ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी केली. मॅक्सवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करणारा वेड ८० धावांवर माघारी परतला. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजननं मॅस्कवेलचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या.
सामन्याच्या ११व्या षटकात नटराजनच्या गोलंदाजीवर वेड पायचीत झाल्याचे स्पष्ट दिसत होते. तेव्हा वेड ५१ धावांवर खेळत होता. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद दिले आणि कोहलीनं DRS मागितला. पण, पंचांनी तो घेऊ दिला नाही कारण कोहली DRS घेण्यापूर्वी विकेटचा प्रीव्ह्यू मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला होता. त्यामुळे वेडला जीवदान मिळाले.