India vs Australia 3rd T20I Live : ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा वादळी खेळी करून ऑस्ट्रेलियासाठी रोमहर्षक विजय मिळवला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धची त्याच्या नाबाद २०१ धावांच्या खेळीनंतर आज त्याने भारताविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर थरारक विजयाची नोंद करताना मालिकेतील आव्हान कायम राखले. कर्णधार मॅथ्यू वेडच्या दमदार खेळीने मॅक्सवेलच्या वादळाला साथ दिली.
ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस
ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad Century) आज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. २४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह ऋतुराजने डाव सावरला. सूर्यकुमार यादव २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला आणि ऋतुराजसह त्याची ५७ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर ऋतुराजने जबरदस्त फटकेबाजी केली. ऋतुराजने ऋतुराज ५७ चेंडूंत १३ चौकार व ७ षटकारांसह १२३ धावांवर नाबाद राहिला. तिलकने नाबाद ३१ धावा करताना ऋतुराजसह ५९ चेंडूंत १४१ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला २ बाद २२२ धावांपर्यंत पोहोचवले. ट्रॅव्हिस हेड व आरोन हार्डीने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून देताना ४.२ षटकांत ४७ धावा चढवल्या. अर्शदीप सिंगने ही जोडी तोडताना हार्डीला ( १६) बाद केले. हेडने १८ चेंडूंत ८ चौकारांसह ३५ धावा केल्या होत्या आणि आवेश खानने ही महत्त्वाची विकेट घेतली. रवी बिश्नोई पुन्हा एकदा गेम चेंजर ठरला आणि त्याने जोश इंग्लिसचा ( १०) त्रिफळा उडवला. तरीही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या १० षटकांत ३ बाद १०५ धावा झाल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस ही स्फोटक फलंदाजाची जोडी मैदानावर होती. १२व्या षटकात या दोघांमधील ताळमेळ चुकला होता आणि सूर्यकुमारने मॅक्सवेलला रन आऊट करण्याची संधी गमावली. एक डायरेक्ट हिट ही विकेट मिळवून देणारा ठरला असता. पण, अक्षर पटेलने १३व्या षटकात स्टॉयनिसची ( १७) विकेट मिळवून देताना ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. बिश्नोईने पुढच्या षटकात टीम डेव्हिडला शून्यावर बाद करून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. मॅक्सवेलने अर्धशतक झळकावून संघर्ष सुरू ठेवला आणि ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ५ षटकांत विजयासाठी ७८ धावा हव्या होत्या. प्रसिद कृष्णाने १८व्या षटकात उत्तम गोलंदाजी करून केवळ ६ धावा दिल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूंत ४३ धावा करायच्या होत्या. सूर्यकुमारकडून जीवदान मिळालेल्या मॅथ्यू वेडने १९व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर २२ धावा चोपल्या. वेडने २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर ५ धावा करून मॅक्सवेलला स्ट्राईक दिली. ४ चेंडूंत १६ धावा ऑसींना हव्या होत्या अन् मॅक्सवेलने ६,४,४,४ धावा चोपून ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने विजय पक्का केला. मॅक्सवेल ४८ चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १०४ धावा चोपल्या. वेड १६ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.