तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा दम दाखवला. मॅथ्यू वेड व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मोठा पल्ला गाठला. प्रत्युत्तरात अॅरोन फिंचनं पहिले षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. विराट कोहलीला दोन जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा उचलला. विराटनं दमदार खेळ करताना सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) पंक्तित स्थान पटकावलं.
आजच्या सामन्यात अॅरोन फिंचचे पुनरागमन झाले, परंतु वॉशिंग्टन सुंदरनं त्याला भोपळाही फोडू न देता दुसऱ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. मॅथ्यू वेड व स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांची ६५ धावांची भागीदारी सुंदरनं तोडली. १०व्या षटकात स्मिथ २४ धावांवर माघारी परतला. पहिल्या दहा षटकांत सुंदरनं ४ षटके फेकली आणि ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. वेड व ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी केली. मॅक्सवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करणारा वेड ८० धावांवर माघारी परतला. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजननं मॅस्कवेलचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात अॅरोन फिंचनं पहिले षटक मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. तिसऱ्या षटकात मॅस्कवेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीही माघारी परतला असता, परंतु स्टिव्हन स्मिथनं त्याचा सोपा झेल सोडला. पाचव्या षटकात अँड्य्रू टायनं स्वतःच्याच गोलंदाजीवर विराटचा रिटर्न कॅच सोडला. त्यानंतर विराट व शिखर धवन या जोडीनं ऑसी गोलंदाजांची धुलाई केली. विराट फुल फॉर्मात दिसत होता. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं एवढंच त्याच्या डोक्यात सुरू होते.