India vs Australia, 3rd Test : अॅडिलेडमध्ये पहिला कसोटी सामना गमावणाऱ्या भारतीय संघानं रहाणेच्या नेतृत्वाखाली मेलबर्न कसोटी जिंकली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. भारतीय संघाचा कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याला जन्मजात नेतृत्वकर्ता असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी मेलबर्न कसोटीतील टीम इंडियाच्या विजयाचे श्रेय रहाणेच्या उपयुक्त योगदानाव्यतिरिक्त त्याच्या धाडसी व हुशार नेतृत्वाला दिले आहे.
चॅपेल म्हणाले,''रहाणेनं मेलबर्नवर भारतीय संघाचे शानदार नेतृत्व केलं, यात कुठली शंका नाही. ज्यांनी कुणी त्याला २०१७मध्ये धर्मशाला येथे संघाचे नेतृत्व करताना बघितले असेल त्यांना कल्पना आली असेल की रहाणेचा जन्म क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठीच झाला आहे.''
धर्मशालामध्ये २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवीत चार सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली होती. भारताने त्यावेळीही लक्ष्याचा पाठलाग केला होता आणि रहाणे ३८ धावा काढून नाबाद होता. चॅपेलने पुढे म्हटले की, ‘कर्णधार म्हणून रहाणे यशस्वी ठरला आहे. तो धाडसी व चतुर कर्णधार आहे. या दोन बाबींव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण गुणांमध्ये त्याच्या नेतृत्वात बरेच काही आहे. ज्यावेळी काही बाबी मनाविरुद्ध घडत असतात, त्यावेळी तो शांतचित्त असतो. त्याने आपल्या सहकाऱ्यांमध्ये मान मिळविला आहे. चांगल्या कर्णधाराचा हा महत्त्वाचा गुण आहे. तो गरजेच्यावेळी धावा करीत असल्यामुळे संघात त्याचा आदर आहे.’
धर्मशाला व मेलबर्न कसोटींमध्ये साम्यचॅपेल म्हणाले, ‘एमसीजीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आणि २०१७ च्या सामन्यात बरेच साम्य आहे. सर्वप्रथम लढत त्याच उभय संघांदरम्यान खेळली गेली. दुसरी बाब म्हणजे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात तळाच्या फळीत उपयुक्त योगदान दिले होते आणि तिसरी बाब म्हणजे छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना दडपणाच्या परिस्थितीत रहाणेने आक्रमक फलंदाजी करीत आवश्यक धावा फटकाविल्या.’
ते म्हणाले, ‘रहाणेने धर्मशालामध्ये त्यावेळी मला प्रभावित केले होते. त्याने पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या कुलदीप यादवकडे चेंडू सोपविला त्यावेळी डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी भागीदारी केली होती. माझ्या मते, हे धाडसी पाऊल होते आणि ते यशस्वी ठरले.’ यादवने लवकरच वॉर्नरला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.