ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया अशा प्रकारे कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ते शक्य झाले. फलंदाजांचे अपयश हे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. पहिल्या सामन्यातही फलंदाजांनी शरणागती पत्करली होती, फक्त गोलंदाजांमुळे तो सामना त्यांना जिंकता आला. दुसऱ्या कसोटीतही फलंदाजांनी तोच कित्ता गिरवला. त्यामुळेच उर्वरित दोन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं संघात बदल केले. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि विल पुकोव्हस्की या दोन तगड्या फलंदाजांना त्यांनी बोलावले. ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ डेव्हिड वॉर्नरला मैदानावर उतरवण्याच्या तयारीत आहे. पण, असं करून ते त्याच्या करिअरशी खेळणार आहेत.
भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत वॉर्नरला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यानं उर्वरित वन डे सामने व ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली. दुखापतीतून न सावरल्यामुळे तो पहिल्या दोन कसोटीतही खेळला नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे अपयश पाहता तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी त्याला संघात सामील करून घेतले. पुर्णपणे तंदुरुस्त नसला तरी वॉर्नरला तिसऱ्या कसोटीत मैदानावर उतरवणार, अशी माहिती संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड यांनी दिली. त्याच्या समावेशानं ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियानं जो बर्न्सला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) यांचे संघात पुनरागमन झाले आहे. बर्न्सला चार डावांत अनुक्रमे ८, ५१, ० आणि ४ धावा करता आल्या. पुकोव्हस्कीही पदार्पणासाठी सज्ज होता, परंतु सराव सामन्यात त्याच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि त्याला माघार घ्यावी लागली. आता तोही तिसऱ्या कसोटीतून पदार्पण करण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाज सिन अॅबोट ( Sean Abbott) याचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सिडनी कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे.मॅकडोनाल्ड म्हणाले,'' तो पूर्ण १०० टक्के तंदुरुस्त नाही. तो मैदानावर उतरत नाही, तो पर्यंत त्याच्या तंदुरुस्तीबाबत जाणून घेणे अवघड आहे.तो ९०-९५ टक्के तंदुरुस्त असेल तरी त्याच्याशी चर्चा केली जाईल आणि त्याला मैदानावर उतरवले जाईल. प्रशिक्षक आणि त्याच्यात याबाबत चर्चा होईल, याची खात्री आहे.''
ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ - टीम पेन, सीन अॅबोट, पॅट कमिन्स, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हीस हेड, मोईसेस हेन्रीक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड , डेव्हिड वॉर्नर