India vs Australia, 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला ७ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघानं मेलबर्न कसोटीत कमबॅक करताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर आतापर्यंत नाट्यमय घटनाच घडत आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma) १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून ताफ्यात दाखल झाला आणि दुसऱ्याच दिवशी चार सहकाऱ्यांना घेऊन मेलबर्न येथील रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेला. त्यात चाहत्याच्या एका ट्विटनं खळबळ उडवली आणि रोहितसह पाच खेळाडूंनी बायो सुरक्षा बबलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची चर्चा रंगली. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची व सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी झाली. त्याचा रिपोर्ट समोर आला आहे.
रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटमध्ये जेवण खाल्लं. एका चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ पोस्ट करून खेळाडूंच बिल भरल्याचा दावा करणारं ट्विट केलं. त्यात त्यानं रिषभ पंतनं त्याला मिठी मारल्याचा व खेळाडूंसोबत फोटो काढल्याचा दावा केला. त्याच्या या ट्विटनं चर्चा घडवली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया व BCCI यांनी तपासाला सुरूवात केली. भारतीय खेळाडूंनी बायो सुरक्षा बबल नियम मोडल्याचा दावा केला गेला. BCCIने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.
अन्य खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेता या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आणि त्यांच्यासह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची व सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी झाली. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ''भारतीय संघातील सदस्य आणि सपोर्ट स्टाफची ३ जानेवारीला RT-PCR टेस्ट करण्यात आली. या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे,''असे BCCIने सांगितले.
यावेळी खेळाडूंचे सर्व लक्ष तिसऱ्या कसोटीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ''खेळाडूंना अन्य कोणाशीही चर्चा करण्याची परवानगी नाही आणि लोकं काय म्हणतात याकडेही त्यांचे लक्ष नाही. आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. आता सर्व लक्ष तिसऱ्या कसोटीवर आहे आणि तो सामना जिंकून २-१ अशी आघाडी घ्यायची आहे,''असे सूत्रांनी सांगितले.
Web Title: India vs Australia, 3rd Test : Biggest positive from Melbourne: Indian players test negative for coronavirus
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.