ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर शनिवारपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीआधी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने कर्णधार रोहित शर्मा याला काही टिप्स दिल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत अंतिम एकादशमध्ये काही बदल करायचा झाल्यास रविचंद्रन अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी द्यावी तसेच हर्षित राणा याला कायम ठेवण्यात यावे, असे मत पुजाराने मांडले. अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर ब्रिस्बेन कसोटीआधी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, 'मला वाटते प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल होईल. फलंदाजी सध्या चांगली होत नाही. त्यामुळे अश्विनच्या जागेवर पुन्हा वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.'
एकच बदल शक्य
पुजारा म्हणाला, 'हर्षित राणा चांगला गोलंदाज आहे. एका सामन्यात चांगली कामगिरी झाली नाही, म्हणून तुम्ही त्याला लगेचच संघातून वगळू शकत नाही. आपल्याला आता पाहावे लागेल की संघव्यवस्थापन काय विचार करीत आहे. पण, माझ्या मते एकच बदल होईल. जर फलंदाजी आणखी मजबूत व्हावी असे वाटत असेल, तर कदाचित अश्विनच्या जागेवर वॉशिंग्टन खेळू शकतो.'
राणाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली, पण...
हर्षित राणाच्या जागेवर कोणी येईल, असे वाटत नाही. राणाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. दुसरा सामना त्याच्यासाठी चांगला ठरला नाही. तथापि, आता संघाने त्याला पाठिंबा द्यायला हवा.' हर्षित राणाने या मालिकेतून कसोटी पदार्पण केले आहे. त्याने पहिल्या सामन्यात चार बळी घेतले; मात्र त्याला दुसऱ्या सामन्यात एकही बळी घेता आला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती.