India vs Australia, 3rd Test, Day 2 : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं सॉलिड सुरुवात केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) या नव्या जोडीनं टीम इंडियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही जोडी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून रडीचा डावही खेळला गेला. २४व्या षटकात अम्पायरने त्यांना यश मिळवून दिलं आणि रोहित बाद झाल्याचा आनंद साजरा झाला. पण, क्षणात हे चित्र बदललं... जाणून घेऊया नेमकं काय झालं...
विल पुकोव्हस्की ( ६२), मार्नस लाबुशेन ( ९१) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर स्टीव्हन स्मिथनं ( १३१) शतकी खेळी केली. पण, जडेजानं ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारू दिला नाही. जडेजानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि स्मिथलाही त्यानं धावबाद केलं. मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. डिसेंबर २०१०नंतर भारतीय सलामीवीरांना आशिया खंडाबाहेर प्रथमच २० हून अधिक षटकं खेळता आली. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनी सेंच्युरियन कसोटीत २९.३ षटकं खेळली होती.
रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचे शतक साजरा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. इयॉन मॉर्गन ( ६३), ब्रेंडन मॅक्युलम ( ६१), सचिन तेंडुलकर ( ६०), महेंद्रसिंग धोनी ( ६०) यांनाही असे करता आले नाही. २४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर सिली पॉईंटला रोहितचा झेल टिपला गेला अन् अम्पायरनं त्याला बाद दिले. पण, रोहितनं लगेच DRS घेतला आणि त्यात चेंडू थायपॅडला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे पंचांना निर्णय बदलावा लागला.