India vs Australia, 3rd Test, Day 2 : रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर गुंडाळला. जडेजानं चार विकेट्स घेतल्या आणि शिवाय स्मिथला धावबाद करून माघारी जाण्यास भाग पाडले. त्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) या नव्या जोडीनं टीम इंडियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. डिसेंबर २०१०नंतर भारतीय सलामीवीरांना आशिया खंडाबाहेर प्रथमच २० हून अधिक षटकं खेळता आली. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनी सेंच्युरियन कसोटीत २९.३ षटकं खेळली होती. रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचे शतक साजरा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. इयॉन मॉर्गन ( ६३), ब्रेंडन मॅक्युलम ( ६१), सचिन तेंडुलकर ( ६०), महेंद्रसिंग धोनी ( ६०) यांनाही असे करता आले नाही.
ख्रिस गेलनंतर एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध षटकाराचे शतक पूर्ण करणारा रोहित पहिलाच खेळाडू आहे. गेलनं इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३० षटकार खेचले आहेत. त्यानंतर रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलं. गेलनं न्यूझीलंडविरुद्ध ८७ षटकार, तर शाहिद आफ्रिदीनं श्रीलंकेविरुद्ध ८६ षटकार लगावले आहेत.