India vs Australia, 3rd Test Day 3 : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन ( Tim Paine) DRSमुळे सध्या चर्चेत आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १५ सेकंदाची वेळ संपल्यानंतर त्यानं DRS घेतला आणि अम्पायरनी तो मान्यही केला. सुदैवानं त्या निर्णयाचा फटका अजिंक्य रहाणेला बसला नाही. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही टीम पेन DRSमुळेच चर्चेत आला. यावेळी त्यानं DRSचा निर्णय विरोधात गेल्यानं अम्पायरशी हुज्जत घातली अन् अपशब्दही वापरले.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियानं दोन विकेट गमावल्या. भारतानं ४ बाद १८० धावा केल्या आहेत. पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं अजिंक्य रहाणेला ( २२) त्रिफळाचीत केलं. त्यानंतर चेतेश्वर पुजारासाठी शॉर्ट लेगवर कॅचची अपिल करण्यात आली. तेव्हा मैदानावरील अम्पायर पॉल विल्सन यांनी नाबाद दिले. पेननं त्वरित DRS घेतला आणि त्यात चेंडू बॅटला लागल्याचा कोणताचा पुरावा हॉटस्पॉट किंवा स्निको मीटरमधून दिसला नाही. स्निकोत बॅटच्या शेजारून चेंडू जाताना थोडी हालचाल दिसली, परंतु पुजाराला बाद करण्यासाठी तो पुरावा पुरेसा नव्हता. त्यामुळे विल्सन यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोन्ही सलामीवीर गमावले. रोहित शर्मा २६, तर शुबमन गिल ५० धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य व चेतेश्वर पुजारा यांनी दिवसअखेर भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या खात्यात २१ धावांची भर घालून अजिंक्य माघारी परतला. विहारीला संधीचं सोनं करण्याची संधी होती, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेणं महागात पडले आणि जोश हेझलवूडनं अप्रतिम थ्रो करत त्याला ( ४) धावबाद केले. पुजारा आणि रिषभ पंत खेळपट्टीवर आहेत. लंच ब्रेकपर्यंत भारतानं ४ बाद १८० धावा केल्या आहेत.