India vs Australia, 3rd Test Day 3 : सिडनी कसोटीतील तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गाजवला. भारतीय फलंदाजांनी ऑसींना विकेट दान दिल्या. भारताचे तीन फलंदाज धावबाद होऊन माघारी परतले. शुबमन गिल ( Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाला पहिल्या डावात २४४ धावांवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीत आणखी भर घातली आणि दिवसअखेर टीम इंडियाच्या गोलंदाजांना झुंजवले. त्यात रिषभ पंत ( Rishab Pant), रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या दुखापतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली. पंत व जडेजा या दोघांनीही दुखापतीचं स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठले. त्यामुळे हे दोघं मैदानाबाहेर होते. जसप्रीत बुमराहही पुर्णपणे तंदुरुस्त दिसत नसल्यानं अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याच्या चिंतेत भर पडली आहे.
पुजारा आणि रिषभ यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाला २४४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतली. पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी माघारी परतल्यानंतर पुजारा आणि रिषभ यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ही जोडी तोडण्यासाठी नवा चेंडू हाती येताच ऑसी जलदगती गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा केला आणि त्यात रिषभ दुखापतग्रस्त झाला. वेदना होत असतानाही तो खेळपट्टीवर राहिला, परंतु त्याला फार काळ संघर्ष करता आला नाही. रिषभ पंतनंतर रवींद्र जडेजालाही नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये, टीम इंडियाला धक्का?
उपहारानंतर रिषभ व पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पुजारानं १७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. रिषभ ६७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ३६ धावांवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. कमिन्सनं चार विकेट्स घेतल्या. जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या पर्वात भारतानं ६४ धावांत ६ विकेट गमावल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. विल पुकोव्हस्की ( १०) आणि डेव्हिड वॉर्नर ( १३) यांना अनुक्रमे मोहम्मद सिराज व आर अश्विननं बाद केलं. त्यानंतर मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथनं डाव सांभाळला. टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, ८८ वर्षांत सातव्यांदा ओढावली नामुष्की
तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं २ बाद १०३ धावा केल्या असून आघाडी १९७ धावांपर्यंत नेली आहे. लाबुशेन ६९ चेंडूंत ६ चौकारांसह ४७ धावांवर, तर स्मिथ २९ धावांवर खेळत आहे.