India vs Australia, 3rd Test Day 3 : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाला २४४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाच्या चिंतेत रिषभ पंतच्या दुखापतीनं वाढ केली आहे. रिषभला दुखापतीच्या स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे आणि दुसऱ्या डावात वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) यष्टिंमागे उभा राहिला. पहिल्या डावातील नायक रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यालाही दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
उपहारानंतर रिषभ व पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पुजारानं १७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रिषभच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. त्यासाठी त्याला मैदानावर उपचार घ्यावे लागले. काही षटकानंतर जोश हेझलवूडनं रिषभला बाद केले. रिषभ ६७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ३६ धावांवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ कमिन्सनं पुजारालाही माघारी पाठवले. रवींद्र जडेजाच्या तोडीस वेगाने पळणे आर अश्विनला काही जमले नाही आणि तो धावबाद झाला. टीम इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला आणि ते ९४ धावांनी पिछाडीवर आहेत. पॅट कमिन्सनं चार विकेट्स घेतल्या. जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या पर्वात भारतानं ६४ धावांत ६ विकेट गमावल्या.