India vs Australia, 3rd Test Day 4 : दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या टीम इंडियानं अजूनही हार मानलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचे पहिले सत्र तुल्यबळ राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात आर अश्विननं ( R Ashwin) टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) पुन्हा मामा बनवत तंबूत जाण्यास भाग पाडले. स्मिथच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं तीनशेपार आघाडी घेतली आहे आणि त्याच्या विकेटनं टीम इंडियाला मोठं यश मिळालं आहे.
२ बाद १०३ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला असता. पण, स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या विहारीनं अगदी सोपा झेल टाकला. मार्नस लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) तो झेल होता. नवदीप सैनीनं मात्र लाबुशेनला डोईजड होऊ दिले नाही. ७३ धावांवर त्याला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सहानं अफलातून झेल घेतला. सैनीनं त्यानंतर मॅथ्यू वेडलाही ( ४) बाद करून ऑसींना दिवसातील दुसरा धक्का दिला.
पहिल्या डावातील शतकवीर स्टीव्ह स्मिथनं अर्धशतकी खेळी केली. सिडनी क्रिकेट मैदानावर सलग पाच अर्धशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठऱला. यापूर्वी इंग्लंडच्या वॉली हॅमोंड यांनी ( १९२८-३६) सलग पाच ५०+ खेळी केल्या होत्या. भारताविरुद्ध दोन्ही डावांत ५०+ खेळी करण्याची स्मिथची ही तिसरी वेळ. त्यानं रिकी पाँटिंग आणि ख्रिस रॉजर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. स्मिथनं यावेळी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ९वे स्थान पटकावले. त्यानं डेव्हिड बून ( ७४२२ धावा) यांना मागे टाकले.