India vs Australia, 3rd Test Day 4 : यजमान ऑस्ट्रेलियानं चौथ्या कसोटीवरील पकड अजून मजबूत केली आहे. टीम इंडियासाठी हा दौरा काही चांगला राहिलेला नाही. भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांनी आधीच दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतली. त्यात कसोटी मालिका सुरु असताना मोहम्मद शमी, उमेश यादव व लोकेश राहुल दुखापतीमुळे मायदेशात परतले. दुष्काळात तेरावा मास म्हणजे तिसऱ्या कसोटीत फॉर्मात असलेला रवींद्र जडेजाही २-३ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला. रिषभ पंतही दुखापतीशी झगडत आहे. एवढी सर्व संकट असताना भारतीय गोलंदाज सोपे झेल सोडून स्वतःसमोरील अडचणी आणखी वाढवताना दिसत आहेत. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर हनुमा विहारीनं ( Hanuma Vihari) सोपा सेल सोडला.
२ बाद १०३ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला असता. पण, स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या विहारीनं अगदी सोपा झेल टाकला. मार्नस लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) तो झेल होता. आधीच दुखापतीचं ग्रहण डोक्यावर असताना भारतीय खेळाडूंकडून अशा चूका झाल्यामुळे माजी खेळाडू सुनील गावस्करही भडकले. नवदीप सैनीनं मात्र लाबुशेनला डोईजड होऊ दिले नाही. ७३ धावांवर त्याला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सहानं अफलातून झेल घेतला. सैनीनं त्यानंतर मॅथ्यू वेडलाही ( ४) बाद करून ऑसींना दिवसातील दुसरा धक्का दिला.