India vs Australia, 3rd Test Day 4 : भारतीय खेळाडूंची गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन पुन्हा एकदा घडवलं. वृद्धीमान सहाचा अफलातून झेल वगळता भारतीय क्षेत्ररक्षकांनी आज निराश केले. दिवसाच्या दुसऱ्या चेंडूपासून झेल सोडण्याचे सत्र सुरू झाले आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तीन सोपे झेल सोडले गेले. त्यात रोहित शर्मानेही सोपा झेल सोडण्यानं चाहते निराश झाले आहे. एकाने तर जाँटी ऱ्होड्सकडे टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का बनत नाही, यावरील आफ्रिकेच्या माजी खेळाडूचे जुने ट्विट व्हायरल केले आहे.
२ बाद १०३ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला असता. पण, स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या विहारीनं अगदी सोपा झेल टाकला. मार्नस लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) तो झेल होता. नवदीप सैनीनं मात्र लाबुशेनला डोईजड होऊ दिले नाही. ७३ धावांवर त्याला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सहानं अफलातून झेल घेतला. सैनीनं त्यानंतर मॅथ्यू वेडलाही ( ४) बाद करून ऑसींना दिवसातील दुसरा धक्का दिला.
लंच ब्रेकनंतर स्मिथनं धावांची गती वाढवली. पण, आर अश्विननं त्याला पुन्हा आपल्या फिरकीवर माघारी जाण्यास भाग पाडले. स्मिथ १६७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ८१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व टीम पेन यांना अनुक्रमे हनुमा विहारी व रोहित शर्मा यांनी जीवदान दिलं. हे दोन्ही झेल जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सुटले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडले. पेन व ग्रीन यांनी जीवदान मिळाल्यानंतर धावांची आघाडी वाढवली आणि झटपट अर्धशतकी भागीदारी केली.