India vs Australia, 3rd Test : भारतीय संघाला सिडनी कसोटीत चांगल्या सुरुवातीनंतर बॅकफुटवर जावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला. टीम इंडियाच्या पहिल्या डावात तीन फलंदाज धावबाद झाले आणि मागील ८८ वर्षांत टीम इंडियावर सातव्यांदा कसोटीच्या एका डावात अशी नामुष्की ओढावली. भारतानं एकदा तर चार फलंदाज धावबाद होऊन गमावले होते.
चेतेश्वर पुजारा ( ५०) आणि शुबमन गिल ( ५०) यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही टीम इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतली. पॅट कमिन्सनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनं दोन आणि मिचेल स्टार्कनं एक विकेट घेतली. या सामन्यात हनुमा विहारी, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह धावबाद झाले. २००८नंतर प्रथमच टीम इंडियाचे तीन फलंदाज एकाच डावात धावबाद होऊन माघारी परतले. २००८मध्ये इंग्लंडविरुद्ध वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग धावबाद झाले होते आणि तो सामना अनिर्णीत राहिला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावबाद होण्याचा संयुक्त विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलियच्या नावावर आहे. दोन्ही संघांनी एका कसोटी सामन्यात प्रत्येकी ४-४ विकेट धावबाद होऊन गमावले आहेत. भारतानं १९५५मध्ये पाकिस्तानविरुद्ध हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. ऑस्ट्रेलियानं १९६९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हा नकोसा विक्रम नावावर केला. भारतानं सात सामन्यांच एका डावात तीन विकेट धावबाद होऊन गमावले होते. त्यापैकी चार सामने अनिर्णित राहिले आणि दोन सामन्यांत हार पत्करावी लागली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या आतापर्यंतच्या कसोटी सामन्यात दुसऱ्यांदा एका डावात तीन फलंदाज धावबाद झाले. यापूर्वी १९६८मध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज एकाच डावात धावबाद झाला आहे आणि तो सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता.