India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही ( Ajinkya Rahane) आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली.
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं त्याचा अनुभव सांगताला ऑस्ट्रेलियात अनेकदा धर्म व रंगांवरून टीका केली गेल्याचे सांगितले. दरम्यान, आजच्या घटनेचा अनेक क्रिकेटपटूनी निषेध केला. ''सिडनी कसोटीत काही चाहत्यांकडून असभ्य वर्तन करण्यात आल्याचे पाहुन वाईट वाटले. त्यांच्यामुळे खेळाला गालबोट लागले,''असे वीरेंद्र सेहवागनं ट्विट केलं. ''सिडनीत जे घडलं, ते दुर्दैवी होतं. अशा वागणुकीता थारा द्यायला नको. खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका का केली जाते, हेच समजत नाही. तुम्हाला खेळाडूंचा आदर करायचा नसेल, तर नका येऊ आणि येथील वातावरण नका बिघडवू,''असे ट्विट व्ही व्ही एस लक्ष्मणने केलं.
अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतलेल्या विराट कोहलीनंही ( Virat Kohli) सिडनी कसोटीत घडलेल्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानं ट्विट केलं की,''वर्णद्वेषी टीकेचा कधीच स्विकार केला जाणार नाही. सीमारेषेवर अशा अनेक घटनांचा सामना करावा लागला आहे. ही रावडी वागणूक आहे. मैदानावर घडणाऱ्या अशा घटनांचं दुःख वाटतं. या घटनेचा गांभीर्यानं आणि लगेच तपास करायला हवा. दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.''