India vs Australia, 3rd Test : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) पुनरागमनामुळे भारतीय संघात चैतन्याचे वातावरण आहे. पण, त्याच्या आगमनानं Playing XI निवडताना कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) समोर आव्हान असणार आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी अजिंक्यची ही चिंता मिटवली आहे. ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी गावस्कर यांनी Playing XI सूचवला आहे. त्यानं रोहित शर्माचा संघात समावेश करताना मयांक अग्रवालसह त्यानं सलामीला यावं, असे मत मांडले आहे.
''मी मयांक अग्रवालला संघात कायम ठेवीन. त्याची कामगिरी चांगली झालेली नाही, हे मला माहित्येय. पण, तो दर्जेदार फलंदाज आहे. त्यामुळे त्याला संघात कायम ठेवून रोहित सह सलामीला पाठवेन,''असे गावस्कर यांनी संजय मांजरेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. रोहित बुधवारी टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला. गुरुवारी त्यानं सरावही केला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावस्कर यांनी दुसऱ्या कसोटीत अनुक्रमे ४५ व ३५* धावा करणाऱ्या शुबमन गिलला ( Shubaman Gill) पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिला आहे. ''सलामीला गिल चांगली कामगिरी करत आहे. असे असले तरी मी त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवणे पसंत करेन,''असेही गावस्कर म्हणाले. ते पुढे म्हणाले,'' १९ वर्षांखालील संघातही गिल सलामीला खेळला होता. सलामीवीर म्हणून त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर तो त्याच आक्रमकतेनं खेळेल का, याची खात्री नाही.'' गिल पाचव्या क्रमांकावर खेळणार म्हणजे गावस्कर यांनी हनुमा विहारीला थेट संघाबाहेर केले आहे.