India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही ( Ajinkya Rahane) आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं त्याचा अनुभव सांगताला ऑस्ट्रेलियात अनेकदा धर्म व रंगांवरून टीका केली गेल्याचे सांगितले. दरम्यान, आजच्या घटनेचा अनेक क्रिकेटपटूनी निषेध केला.
भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. मार्नस लाबुशेन ( ७३), स्टीव्हन स्मिथ ( ८१) आणि कॅमेरून ग्रीन ( ८४) यांनी दमदार खेळ केला. पण, टी टाईम होण्यापूर्वी सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि जवळपास १५-२० मिनिटे सामना थांबवण्यात आला. पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सिराजनं सांगितलेल्या स्टँडमधून सहा प्रेक्षकांना बाहेर पाठवण्यात आले.
''सिडनी कसोटीत काही चाहत्यांकडून असभ्य वर्तन करण्यात आल्याचे पाहुन वाईट वाटले. त्यांच्यामुळे खेळाला गालबोट लागले,''असे वीरेंद्र सेहवागनं ट्विट केलं.