मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम 13 सदस्यांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताने लोकेश राहुल आणि मुरली विजय या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या जागी संघात मयांक अग्रवाल आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे. पण, मयांक बरोबर डावाची सुरुवात करणार कोण हा पेच कायम आहे.
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मालिकेत जोरदार कमबॅक केले. 1-1 अशा बरोबरीत असलेली ही मालिका बॉक्सिंग डे कसोटीत रंगतदार होणार आहे. त्यामुळे भारताने अपयशी ठरलेल्या दोन्ही सलामीवीरांना बसवण्याचा निर्णय घेतला. मयांकसोबत सलामीला हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र संघात रोहित शर्माचा समावेश असल्याने तोही सलामीला येऊ शकतो.
दरम्यान, आर अश्विन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे जडेजाला स्थान देण्यात आले. दुसऱ्या कसोटीतील टीका झाल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जडेजा तंदुरुस्त नसल्याचा दावा केला होता. मात्र, बीसीसीआयने त्यांचा हा दावा खोडून काढला आणि जडेजाला तंदुरुस्त घोषित करून संघात समाविष्ट करून घेतले.
दरम्यान ऑस्ट्रेलियानेही तिसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. त्यांनी संघात एक बदल करतना पीटर हॅण्ड्सकोम्बच्या जागी मिचेल मार्शला संधी दिली आहे.