India vs Australia : अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत इतिहास रचला. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियाला एकमागून एक धक्के बसले. विराट कोहली मायदेशी परतला, मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादव जायबंदी झाला. तरीही अजिंक्य खचला नाही आणि त्यानं शतकी खेळीसह कल्पक नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले. आता तिसऱ्या कसोटीपूर्वी अजिंक्यनं चाहत्यांना भावनिक आव्हान केले आहे.
पहिल्या डावात ११२ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा 'Mullagh Medal' नं सन्मान करण्यात आला आणि हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मेलबर्नवर शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्यनं पुन्हा एकदा त्याचे नाव MCGच्या मानाच्या फलकावर झळकावले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारीला सिडनीत खेळवला जाईल.
अजिंक्यनं ट्विट केलं की,''तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार. संघानं विजय मिळवून तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणला, हे आमचं मोठं यश आहे. पुढेही असाच पाठिंबा आम्हाला हवा आहे आणि पुढील दोन सामन्यांत आम्ही अजून अथक परिश्रम करू.''
लोकेश राहुलचा संघात समावेश आहे, परंतु त्याला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी कधी मिळेल, हा सवाल प्रत्येक जण करतोय. हनुमा विहारीच्या अपयशानं लोकेश राहुलच्या अंतिम ११मधील मार्ग मोकळा झाला आहे. तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल, हनुमा व उमेश ( दुखापतग्रस्त) यांच्या जागी रोहित शर्मा, लोकेश राहुल व टी नटराजन यांच्यासह अजिंक्य रहाणे अंतिम ११ खेळाडू घेऊन मैदानावर उतरणार आहे.
टीम इंडियाचे संभाव्य Playing XI - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, टी नटराजन