Join us  

India vs Australia, 3rd Test : प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांप्रमाणे वागणूक नकोय; खेळाडू व प्रेक्षकांसाठीच्या नियमांवरून टीम इंडिया नाराज

India vs Australia, 3rd Test : नवीन वर्षाला रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटला भेट दिली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला व खेळाडूंनी बायो-बबल नियम मोडल्याची चर्चा सुरू झाली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 04, 2021 12:35 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियातील सदस्य नको त्या कारणामुळे चर्चेत आले. भारतीय संघातील पाच सदस्यांवर बायो-बबल नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे खेळाडूंनी बायो-बबल नियमांचं काटेकोर पालन करावं, अशा सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून खेळाडूंना करण्यात आल्या. त्याचवेळी सिडनी कसोटीसाठी २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. टीम इंडियाला हे वागणं काही पटलेलं दिसत नाही.

भारतीय खेळाडूंची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यात सर्व सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर टीम इंडियाला मेलबर्नवरून सिडनीस रवाना होण्याची परवानगी मिळाली. भारतीय संघानं सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची तयारी दर्शवली आहे, पण क्रिकेटपटू व फॅन्ससाठी समान नियम असायला हवं, अस मत टीम इंडियाच्या सूत्रांनी Cricbuzz शी बोलताना व्यक्त केलं. ''तुम्ही फॅन्सना मैदानावर येण्याची परवानगी देता, त्यांना स्वातंत्र्य देता आणि त्याचवेळी खेळाडूंना हॉटेलमध्ये राहण्यास व क्वारंटाईन होण्यास सांगता, हा विरोधाभास आहे. विशेष म्हणजे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही या सूचना. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांप्रमाणे वागणूक आम्हाला नकोय,''असे टीम इंडियातील सूत्रांनी Cricbuzz ला सांगितले.

ते पुढे म्हणाले,''आम्ही सुरुवातीपासून सांगतोय, आम्ही ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करू. त्यामुळे जर प्रेक्षकांना मैदानावर परवानगी नसेल, तर खेळाडूंना हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहण्यास सांगण्याला अर्थ आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकिय टीमनं आम्हाला हॉटेल रुमच्या बाहेर पडू नका असे सांगितले आहे. त्यावर संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ सदस्यानं नाराजी व्यक्त केली.''

नवीन वर्षाला रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटला भेट दिली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला व खेळाडूंनी बायो-बबल नियम मोडल्याची चर्चा सुरू झाली. BCCIनं सोमवारी सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या