मुंबई : भारतीय संघाने थरारक झालेल्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली. भारतीय संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका जिंकली. संघ दुखापतींनी ग्रासलेला अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाची धुरा हाती घेतली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दरम्यान, या विजयामुळे संघातील खेळाडूंचे आणि अजिंक्य रहाणेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. यातच राज्याचे महसूलमंत्री आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे.
सगळ्या भारतीयांसाठी आणि संगमनेरवासियांसाठी आज आनंदाचा क्षण आहे. अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे आणि इतिहास रचणे हे अभूतपूर्व आहे. शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील त्याचे नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो, हे अजिंक्य रहाणे यांनी आज जगाला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे.
याचबरोबर, यापूर्वी अनेक वेळा अजिंक्य रहाणेंना डावलण्यात आले. योग्य संधी दिली गेली नाही. प्रत्येक वेळी आम्हाला दुःख झाले. मात्र, त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आज त्यांनी त्यांच्यातले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. अजिंक्य रहाणेंचा प्रवास ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे. आज मी त्यांचे आणि त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन करतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
रहाणेला बाबांनी वीर बाजीप्रभूंची कथा मेसेज केली अन् भारतीय संघाने मालिका जिंकली!चौथ्या कसोटीआधी अजिंक्यचे वडील मधुकर रहाणेंसोबत बोलणं झाले. वडिलांनी अजिंक्यला एक गोष्ट मेसेज केली. बाजीप्रभू देशपांडेंनी प्राणाची बाजी लावत खिंड लढवली होती. हाताशी असलेल्या मावळ्यांसोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले होते, ही गोष्ट अजिंक्यला बाबांनी पाठवली होती. अजिंक्यने यातून योग्य तो बोध घेत फारसा अनुभव गाठिशी नसलेल्या खेळाडूंना आत्मविश्वास दिला. या खेळाडूंनी बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला जोरदार टक्कर दिली. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियन संघ गेल्या ३२ वर्षांपासून अजिंक्य होता. या मैदानात भारतीय संघ कधीही जिंकलेला नाही, हा इतिहास होता. मात्र अजिंक्यच्या शिलेदारांनी याच मैदानात ऑस्ट्रेलियाला पाणी पाजत नवा इतिहास लिहिला. चौथ्या डावात, सामन्याच्या पाचव्या दिवशी आव्हानात्मक स्थितीत ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत कसोटीसह मालिकादेखील खिशात घातली.