India vs Australia, 4th Test : अनुभवी गोलंदाज संघात नसूनही टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवसावर तुल्यबळ टक्कर दिली. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर यांच्याकडे मिळून चार कसोटी सामन्यांचा अनुभव, त्यात टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांचे पदार्पण, अशा नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी फलंदाजांना चकवले. अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) कडून ऑसी फलंदाज मार्नस लाबुशेनचा झेल सुटला नसता, तर चौथ्या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्याच नावावर असता. लाबुशेनचं खणखणीत शतक आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. पदार्पणवीर टी नटराजननं पुन्हा एकदा प्रभावीत केलं. नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) दुखापतीमुळ मैदान सोडल्यानं अजिंक्यची डोकेदुखी वाढली. पण, उपलब्ध खेळाडूंकडून चांगली कामगिरी कशी करून घ्यायची, हे त्याला चांगले माहीत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मार्कस हॅरीससह ( ५) डेव्हिड वॉर्नर सलामीला आला. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर या दोघांनी ऑसींच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. वॉर्नर ( ४) पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर ९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ठाकूरनं ऑसींना दुसरा धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन ही सेट जोडी वॉशिंग्टन सुंदरनं तोडली. स्मिथ व लाबुशेन ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. या जोडीनं १५६ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली.
लाबुशेन ३७ धावांवर असताना नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर अजिंक्यनं झेल टाकला. त्यानंतर ४८ धावांवर असताना चेतेश्वर पुजारानं स्लीपमध्ये लाबुशेनला जीवदान दिलं. अजिंक्यच्या तुलनेत हा झेल थोडा अवघडच होता. स्मिथ बाद झाल्यानंतर लाबुशेननं चौथ्या विकेटसाठी मॅथ्यू वेडसह १७९ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. लाबुशेननं कसोटीतील पाचवे आणि टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक झळकावले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ५ शतकांचा विक्रमही लाबुशेननं नावावर केला. टी नटराजननं या दोघांनाही माघारी पाठवलं. लाबुशेन २०४ चेंडूंत ९ चौकारांसह १०८ धावांवर, तर वेड ४५ धावांवर बाद झाले.
यानंतर टीम इंडियाला सामन्यावरील पकड मजबूत करण्याची संधी होती, परंतु टीम पेन व कॅमेरून ग्रीन यांनी तसं होऊ दिलं नाही. या दोघांनी दिवसअखेर खिंड लढवताना अर्धशतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं दिवसअखेर ५ बाद २७४ धावा केल्या आहेत. टी नटराजननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पेन ३८ आणि ग्रीन २८ धावांवर नाबाद राहिले.