India vs Australia, 4th Test Day 3 : भारतीय संघानं तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर गाडी रुळावर येईल असे वाटत होते. स्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चतूर खेळ करताना चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांना माघारी पाठवले. मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली आहे.
दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. तिसऱ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे, परंतु पहिल्या सत्रात त्याने त्रास दिलेला नाही. पुजारा व अजिंक्य यांनी संयमी सुरुवात करताना ४५ धावा जोडल्या आणि संघाच्या फलकावर १०५ धावा असताना टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाचा पहिला धक्का बसला. चेतेश्वर पुजारा ९४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीनं २५ धावा करून जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी अजिंक्यला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन जीवदान मिळाले.
स्टार्कनं टाकलेला चेंडू अजिंक्यच्या बॅटला एज लागून गल्लीच्या दिशेनं गेला, सुदैवानं तेथे फिल्डर नसल्यानं त्याला चौकार मिळाले. पण, ५५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. मॅथ्यू वेडनं कॅच घेत अजिंक्यला माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्य ९३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीनं ३७ धावांवर माघारी परतला. लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात मयांक ( ३८) जोश हेझलवूडनं माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला.