India vs Australia, 4th Test Day 5 : गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा ( Rohit Sharma) ७ धावांवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पण, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी पहिले सत्र खेळून काढले. गिलनं तुफान फटकेबाजी करून अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीनंतर भारताचा माजी सालमीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं भन्नाट ट्विट केलं.
गॅबाची खेळपट्टी पाहता हे लक्ष्य सोपं नक्कीच नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांचा कस लागणे हे निश्चित आहे. रोहितकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा फोल ठरली. कमिन्सच्या स्वींग चेंडूवर रोहित झेलबाद होऊन माघारी परतला. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळालेल्या गिलनं ऑसींचा समाचार घेतला. त्याचे फटके पाहून सारेच अवाक् झाले. कमिन्स, हेझलवूड यांचा चेंडू बॅकफूटवर जाऊन कव्हरच्या दिशेनं तो सहज टोलवत होता.
गिलनं या दौऱ्यातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. लंच ब्रेक झाला तेव्हा गिल ६४ आणि पुजारा ८ धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाच्या १ बाग ८३ धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी ६२ षटकांत २४५ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा करून पुजाराला जायबंदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला नाही. लंच ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा थोडक्यात वाचला, ऑसींनी DRS घेतला असता तर कदाचित त्यालाही तंबूत परतावे लागले असते.