India vs Australia, 4th Test Day 4 : ब्रिस्बेन कसोटीचा चौथा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी अनुक्रमे ५ व ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया दुसरा डाव २९४ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान आहे आणि गॅबाच्या खेळपट्टीचा अंदाज पाहता, या धावा करणे सोपं नसेल... चौथ्या दिवशीच खेळपट्टीनं रंग दाखवले आणि भारतीय गोलंदाजांनी अनपेक्षित उसळीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर ऑसी फलंदाजांना बॅकफूटवर पाठवले. स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक हीच ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक बाब ठरली. पण, मैदानावरील घडामोडींचे समालोचन करणाऱ्या शेन वॉर्नच्या ( Shane Warne) एका प्रतिक्रियेवर प्रचंड गदारोळ उठला आहे.
टी नटराजननं शॉर्ट बॉल टाकून ऑसी फलंदाजांना हैराण केलं. हा ऑस्ट्रेलिया दौरा टी नटराजनसाठी संस्मरणीय ठरला आहे. याच दौऱ्यातून त्यानं वन डे, ट्वेंटी-20 व कसोटी संघात पदार्पण केले. कसोटीत नटराजननं सात नो बॉल फेकले आणि त्यावरून वॉर्ननं कमेंट केली. त्याच्या या कमेंटवर नेटिझन्स खवळले आणि वॉर्न फिक्सिंगचा आरोप करतोय, असा अंदाज बांधून त्याची शाळा घेतली.नटराजननं पहिल्या डावात सहा नो बॉल फेकले आणि चौथ्या दिवशी एक.. यापैकी पाच नो बॉल हे षटकाच्या पहिल्याच चेंडूवर होते.
''नटराजन गोलंदाजी करताना एक गोष्ट माझ्या नजरेनं हेरली आहे. त्यानं या सामन्यात सात नो बॉल फेकले आणि क्रीजपासून त्याचा पाय बराच लांब होता,''असे वॉर्न फॉक्स क्रिकेटवर बोलताना म्हणाला. तो पुढे म्हणाला,''त्यापैकी पाच नो बॉल हे पहिल्याच चेंडूवर फेकले गेले. ही गोष्ट थोडी खटकणारी आहे. आम्ही प्रत्येकानं नो बॉल फेकले आहेत, परंतु षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाच नो बॉल, ही गोष्ट इंटरेस्टींग आहे.''
त्याच्या या प्रतिक्रीयेतून कुठेच नटराजनवर फिक्सिंगचा थेट आरोप केला गेला नाही. परंतु, सोशल मिडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.