India vs Australia, 4th Test : अनुनभवी गोलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियानं चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला तुल्यबळ टक्कर दिली. डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड यांना माघारी पाठवून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्यातील चुरस कायम राखली. टी नटराजननं सलग दोन धक्के देताना टीम इंडियाला कमबॅक करून दिले आहे. पण, टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. गोलंदाज नवदीप सैनीला ( Navdeep Saini) स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे तो पहिल्याच दिवशी मैदानातून बाहेर गेला आहे. उद्या तो मैदानावर उतरेल की नाही, हे वैद्यकिय अहवाल आल्यानंतर BCCI स्पष्ट करेल.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मार्कस हॅरीससह डेव्हिड वॉर्नर सलामीला आला. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर या दोघांनी ऑसींच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. वॉर्नर पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर ९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ठाकूरनं ऑसींना दुसरा धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन ही सेट जोडी वॉशिंग्टन सुंदरनं तोडली. स्मिथ व लाबुशेन ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. या जोडीनं १५६ चेंडू खेळून काढताना ७० धावांची भागीदारी केली.
लाबुशेन ३७ धावांवर असताना नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर अजिंक्यनं झेल टाकला. त्यानंतर ४८ धावांवर असताना चेतेश्वर पुजारानं स्लीपमध्ये लाबुशेनला जीवदान दिलं. अजिंक्यच्या तुलनेत हा झेल थोडा अवघडच होता. स्मिथ बाद झाल्यानंतर लाबुशेननं चौथ्या विकेटसाठी मॅथ्यू वेडसह १७९ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. लाबुशेननं कसोटीतील पाचवे आणि टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक झळकावले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ५ शतकांचा विक्रमही लाबुशेननं नावावर केला. टी नटराजननं या दोघांनाही माघारी पाठवलं. लाबुशेन २०४ चेंडूंत ९ चौकारांसह १०८ धावांवर, तर वेड ४५ धावांवर बाद झाले.