ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया चौथा सामना गुरुवारपासून कर्णधार विराट कोहलीला इतिहास घडविण्याची संधी सौरव गांगुलीलाही मागे टाकणार कोहली
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखील भारतीय संघ गुरुवारी सिडनीत इतिहास घडविण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. मेलबर्न कसोटीत 137 धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या कामगिरीमुळे भारतीय संघाचे मनोबल चांगलेच उंचावले आहेत आणि सिडनी कसोटीत अनिर्णीत निकालही त्यांना मालिका खिशात घालण्यासाठी पुरेशी आहे. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली तरीही बॉर्डर-गावस्कर चषक हा भारतीय संघाकडेच राहणार आहे. सिडनीत होणाऱ्या चौथ्या सामन्यात कोहलीला चार विक्रमांची नोंद करण्याची संधी आहे.
भारतीय संघाने अॅडलेड कसोटी जिंकून मालिका विजयाच्या दिशेने पाऊल टाकले, परंतु पर्थवर यजमानांनी कमबॅक केले. मेलबर्न कसोटीत चेतेश्वर पुजाराचे शतक आणि जसप्रीत बुमराच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 37 वर्षांनंतर भारताने मेलबर्नवर विजय मिळवला, तर 41 वर्षांत प्रथमच भारताने दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला.
सिडनी कसोटीतही भारतीय संघ फेव्हरेट मानला जात आहे. भारतीय संघाने सिडनी कसोटीत विजय मिळवल्यात ऐतिहासिक कामगिरी होणार आहे. ऑस्ट्रेलियात 11 प्रयत्नांत कसोटी मालिका जिंकणारा कोहलीचा संघ पहिलाच ठरणार आहे. 1977-78 च्या मालिकेत भारतीय संघाने बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकले होते आणि कोहलीला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारताने 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलियाला बरोबरीवर रोखले होते.
सिडनीत विजय मिळवून परदेशात तीन सामने जिंकून दोन मालिका जिंकणारा कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2017 मध्ये श्रीलंकेवर निर्भेळ यश मिळवले होते. या कामगिरीसह कोहली 76 वर्षांचा भारतीय संघाचा कसोटी विक्रमही मोडेल. आशियाई उपखंडाबाहेर मालिकेत तीन कसोटी जिंकण्याचा विक्रम करणारा कोहली 1968नंतर पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1967-68 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3-1 असा विजय मिळवला होता.
परदेशात सर्वात यशस्वी भारतीय कर्णधाराचा विक्रमही कोहलीला खुणावत आहे. मेलबर्नवर विजय मिळवून कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या परदेशातील 11 कसोटी विजयाशी बरोबरी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियात तीन कसोटी जिंकणाऱ्या बिशन सिंग बेदी आणि मुश्ताक मोहम्मद यांच्या विक्रमाशीही कोहलीला बरोबरी करण्याची संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना गुरुवारपासून होणार आहे.
Web Title: India vs Australia, 4th Test: Virat Kohli on verge of breaking four captaincy records in Sydney
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.