Join us  

India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांनंतर भारताला वन डे मालिकेत नमवले

India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर झालेल्या नामुष्कीची परतफेड केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 9:24 PM

Open in App

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर झालेल्या नामुष्कीची परतफेड केली. भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-20 मालिकेपाठोपाठ वन डे मालिकेतही विजय मिळवत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला मोठा धक्का दिला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 0-2 अशा पिछाडीवरून कमबॅक करताना 3-2 अशी मालिका खिशात घातली. तब्बल दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीत यजमानांवर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कांगारूंनी या ऐतिहासिक कामगिरीसह वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आत्मविश्वास कमावला.उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर चाप लगावला. पण, त्याच्या अखेरच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाने ती कसर भरून काढली. भुवनेश्वर कुमारने तीन, तर रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव (74) सर्वात महागडा गोलंदाज ठरला.  पाचव्या वन डे सामन्यात विजयासाठी भारताला 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन (12) त्वरित माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघावर दडपण आले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने भारताला पहिला धक्का दिला, परंतु त्यानंतर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शिखर धवन, विराट कोहली आणि रिषभ पंत माघारी परतल्यानंतर रोहितने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेताना अर्धशतक झळकावले. पण, रोहित माघारी परतताच भारताचा डाव गडगडला.अॅडम झम्पाने एकाच षटकात रोहित व रवींद्र जडेजाला बाद करून ऑस्ट्रेलियाला विजयासमीप नेले. केदार जाधव एका बाजूनं तळाच्या गोलंदाजांना सोबत घेऊन खिंड लढवत होता, परंतु त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. केदारला भुवनेश्वर कुमारने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 91 धावा जोडल्या. भुवीनं 46, तर केदारनं 44 धावा केल्या. पॅट कमिन्सने एका षटकात दोघांना बाद केले. 

ऑस्ट्रेलियाने 2009 साली भारतात वन डे मालिकेत 4-2 असा विजय मिळवला होता. त्यानंतर 2010 ( 0-1), 2013 ( 2-3) आणि 2017 (1-4) साली ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता. आतापर्यंत केवळ चारच संघांना 0--2 अशा पिछाडीवरून वन डे मालिका जिंकता आल्या आहेत. यात दक्षिण आफ्रिकेने ( पाकिस्तान 2003 आणि इंग्लंड 2016) दोन वेळा असा पराक्रम केला आहे, तर पाकिस्तान ( भारत 2015) आणि बांगलादेश ( झिम्बाब्वे 2005) यांनी प्रत्येकी एक वेळा अशी कामगिरी केली आहे. या यादित आता ऑस्ट्रेलियाचा संघ दाखल झाला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाबीसीसीआय