नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : फिरोज शाह कोटला वन डे सामन्यात सर्वात वेगवान 6000 धावा करणाऱ्या सलामीवीराचा मान पटकावणाऱ्या रोहित शर्मानं बुधवारी आणखी एक विक्रम नावावर केला. त्याने वन डे क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार करताना माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने 74 चेंडूंत 4 चौकारांसह अर्धशतकही झळकावले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे 41 वे अर्धशतक ठरले.पाचव्या वन डे सामन्यात विजयासाठी भारताला 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन (12) त्वरित माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघावर दडपण आले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने भारताला पहिला धक्का दिला, परंतु त्यानंतर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितनं या सामन्यात 13वी धाव घेताच नावावर एक विक्रम नोंदवला, त्यानं या कामगिरीसह महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला यांचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावले.लक्ष्याचा पाठलाग करताना धवनने सुरुवात तर चांगली केली, परंतु पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक अॅलेक्स करीच्या हाती झेल देत तो माघारी परतला. त्यानंतर रोहित व विराटने संयमी खेळ केला. रोहित वन डे क्रिकेटमध्ये 200 वा डाव खेळत आहे. या सामन्यात त्यानं सलामीवीर म्हणून सर्वात जलद 6000 धावांचा विक्रम नावावर केला. त्यानं 121 डावांत हा पल्ला गाठला. आमला आणि तेंडुलकर यांना हा पल्ला गाठण्यासाठी अनुक्रमे 123 व 133 डाव खेळावे लागले.
शिखर धवन, विराट कोहली आणि रिषभ पंत माघारी परतल्यानंतर रोहितने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेताना अर्धशतक झळकावले. त्याने 200 व्या डावात 8000 धावांचा पल्ला पार करून गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. वन डेत सर्वात जलद 8000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो गांगुलीसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमात कोहली ( 175 डाव) आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स ( 182) आघाडीवर आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वन डेत 8000 धावा करण्यासाठी 210 डाव खेळावे लागले.