नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. पाचव्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर 273 धावांचे लक्ष्य आहे. भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर चाप लगावला. पण, त्याच्या अखेरच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाने ती कसर भरून काढली. भुवनेश्वर कुमारने तीन, तर रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव (74) सर्वात महागडा गोलंदाज ठरला. या लक्ष्याचा पाठलाग करून भारताला 1996 चा विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारतीय संघाने हे लक्ष्य पार केल्यास कोटलावर यशस्वी पाठलाग करण्याची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरेल. कोटलावर भारताने 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 278 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर 1966 मध्ये श्रीलंकेने कोटलावरच भारताच्या 272 धावांचे लक्ष्य पार केले होते आणि आज हा विक्रम मोडण्याची संधी भारताला आहे.