बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांतच आटोपल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या डावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
रोहित शर्माला या डावाच्या सुरुवातीला दोन जीवदानं मिळाली होती. मात्र त्यांचा तो फायदा उचलू शकला नाही. डावातील सहाव्या षटकात त्याने आपली विकेट गमावली. रोहित शर्माला मॅथ्यू कुन्हमेनने यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातून यष्टीचित केले. रोहित शर्माने २३ चेंडूत १२ धावा काढल्या. त्याबरोबरच बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत यष्टीचित होणारा रोहित शर्मा हा पहिला कर्णधार ठरला आहे.
त्याबरोबरच रोहित शर्मा सर्वाधिक वेळा यष्टीचित होण्याच्या बाबतीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावार पोहोचला आहे. रोहित आतापर्यंत १० वेळा यष्टीचित झाला आहे. याबाबतीत रोहित शर्माने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची बरोबरी केली आहे. तर सर्वाधिक वेळा यष्टीचित होणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सौरव गांगुली पहिल्या क्रमांकावर आहे. तो १५ वेळा यष्टीचित झाला होता.
रोहित शर्मा या मालिकेत पहिल्यांदाच नाणेफेक जिंकला. मात्र त्या संधीचा त्याला आणि भारतीय संघाला फायदा उचलता आला नाही. भारतीय संघ पहिल्या डावात ३३.२ षटके खेळून अवघ्या १०९ धावांत गारद झाला. भारतीय संघाकडून सर्वाधिक २२ धावा विराट कोहलीने काढल्या. तर या मालिकेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या शुभमन गिलने २१ धावा काढल्या. यष्टीरक्षक श्रीकर भरत आणि उमेश यादवने प्रत्येकी १७ धावा काढल्या.
Web Title: India Vs Australia: A costly mistake in Indore Test, Rohit Sharma's embarrassing record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.