India Vs Australia : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांत या दोघांनी संयमी खेळ करताना बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. या सामन्यात नवदीप सैनीला ( Navdeep Saini) अंतिम ११मध्ये पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. BCCIनं गुरुवारी पाठीच्या दुखापतीमुळे सैनीला बॅक अप म्हणून टी नटराजनचा ( T Natarajan) वन डे संघात समावेश केला. पण, अनफिट सैनीला संधी दिल्यानं BCCIच्या कारभारावर चर्चा रंगली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि या सामन्यात समालोचक करणाऱ्या अॅडम गिलख्रिस्टकडून चूक झाली. नेटिझन्सनी ती लक्षात आणून दिल्यानंतर माजी खेळाडूनं माफी मागितली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला. ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल मार्शच्या जागी स्टीव्ह स्मिथला संधी दिली, तर टीम इंडियासाठी शिखर धवनसह मयांक अग्रवाल सलामीला खेळणार आहे. मनीष पांडे, शुबमन गिल, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन हे आजच्या सामन्याला मुकले.
या सामन्यात सैनी गोलंदाजीला आला तेव्हा समालोचक गिलख्रिस्टनं त्याच्या वडिलांना श्रंद्धांजली वाहिली. मोहम्मद सिराजच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आणि गिलख्रिस्टनं सिराजच्या जागी सैनीच्या वडिलांना श्रद्धांजला वाहिली. नेटिझन्सनी ही मोठी चूक लक्षात आणून दिल्यानंतर गिलीनं माफी मागितली.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचं शनिवारी निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.