India vs Australia, 4th Test Day 5 : टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले.
शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. ऑसी गोलंदाजांचा मारा शरिरावर झेलूनही चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभ पंतला बढती देण्यात आली, पण त्यानेही दमदार खेळी केली. पुजारानं चौथ्या विकेटसाठी पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. नवीन चेंडू घेतल्यानंतर पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात पुजाराची विकेट घेतली. अम्पायर कॉलमुळे पुजाराला २११ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाच्या विजयासाठीचे प्रयत्न केले.
पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रिषभ पंत १३८ चेंडूंत ८९ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. या विजयानंतर अजिंक्यनं विजयाची ट्रॉफी पदार्पणवीर टी नटराजनच्या हाती दिली. तत्पूर्वी, टीम इंडियानं स्वाक्षरी केलेली जर्सी १००वा कसोटी खेळणाऱ्या नॅथन लियॉनला भेट दिली.
Web Title: India vs Australia : Ajinkya Rahane giving the Border Gavaskar Trophy to Natarajan, nice gesture from the captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.