India vs Australia : अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत इतिहास रचला. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियाला एकमागून एक धक्के बसले. विराट कोहली मायदेशी परतला, मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादव जायबंदी झाला. तरीही अजिंक्य खचला नाही आणि त्यानं शतकी खेळीसह कल्पक नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले. पहिल्या डावात ११२ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा 'Mullagh Medal' नं सन्मान करण्यात आला आणि हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मेलबर्नवर शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्यनं पुन्हा एकदा त्याचे नाव MCGच्या मानाच्या फलकावर झळकावले. सर्व भारतीयांसाठीच्या या अभिमानास्पदाच्या क्षणाचा व्हिडीओ BCCIनं पोस्ट केला.
अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले. ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात विजयी धाव घेणारा अजिंक्य हा पाचवा परदेशी कर्णधार ठरला. यापूर्वी आर्थर श्रेव्स्बरी ( १८८४), अॅर्ची मॅकलॅऱेन ( १८९७), माईक ब्रेरली ( १९७९) व क्लाईव्ह लॉईड ( १९८२) यांनी अशी कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीनंतर कसोटीत विजयी धाव घेणारा अजिंक्य रहाणे हा पहिलाच कर्णधार. धोनीनं २०१३मध्ये दिल्ली कसोटीत विजयी धाव घेतली होती.