India Vs Australia : अॅरोन फिंच ( Aaron Finch), स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith), डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या मर्यादा पहिल्या वन डे सामन्यात स्पष्ट केल्या. ऑस्ट्रेलियानं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे आघाचे चार शिलेदार झटपट माघारी परतले. शिखर धवन व हार्दिक पांड्या यांनी खिंड लढवली, परंतु त्यांना विजय मिळवून देता आला नाही. ऑस्ट्रेलियानं पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला मयांक अग्रवाल व धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. जोश हेझलवूडनं ही जोडी तोडताना मयांकला ( २२) माघारी पाठवलं. त्यानंतर झेलडवूडनंच १०व्या षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. त्यानं कर्णधार विराट कोहली ( २१) आणि श्रेयस अय्यर (२) यांना बाद केले. आयपीएलमध्ये फॉर्मात दिसलेला लोकेश राहुल १२ धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला.