Join us  

india vs australia : भारतात ‘खराब’ खेळपट्ट्या, मग गाबावर दोन दिवसांत कसोटी संपली, किती गुण दिले?

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला.  अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 11:21 AM

Open in App

सिडनी :  भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला.  अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने जोरदार टीका केली. अशा खराब खेळपट्ट्या बनविताना काहीतरी खोडसाळपणा झाला असावा, अशी शंकादेखील टेलरने व्यक्त केली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाईल. नागपूर आणि नवी दिल्लीच्या खेळपट्ट्यांना आयसीसीने सरासरी रेटिंग दिले असून इंदूरच्या खेळपट्टीला सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी ‘खराब’ संबोधले. त्यापोटी तीन डिमेरिट गुण देण्यात आले. 

 सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना टेलरने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग योग्य असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘मालिकेत खेळपट्ट्या खराब आहेत असे मला वाटते.  इंदूरची खेळपट्टी तीन सामन्यांपैकी सर्वात वाईट होती. पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळत होती.   चौथ्या किंवा पाचव्या दिवशी असे घडले तर  समजू शकतो.

इंदूरमध्ये भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना सव्वा दोन दिवसांत आटोपला. या सामन्यातील खेळपट्टीला आयसीसीने ‘खराब’ संबोधले. दिग्गज सुनील गावसकर यांना आयसीसीची टिप्पणी पचनी पडलेली नाही. त्यांनी सडकून टीका करताना नोव्हेंबरमध्ये ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर दोन दिवसांत आटोपलेल्या कसोटीचे उदाहरण देत विचारणा केली. त्या खेळपट्टीला किती डिमेरिट गुण मिळाले आणि तिथे मॅच रेफरी कोण होता, असा प्रश्न गावसकरांनी उपस्थित केला. आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करीत म्हटले की,  ‘कोरडी असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये समतोल राखला गेला नाही. ही खेळपट्टी  सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना अनुकूल होती. चेंडू अधिक उसळीदेखील घेत नव्हता.’ 

गावसकर म्हणाले, ‘मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी सल्लामसलत केल्यानंतर आयसीसीला अहवाल सादर केला. ऑस्ट्रेलियातील गाबा कसोटीत ख्रिस ब्रॉड यांना  खेळपट्टीत काहीही दोष दिसला नाही काय? त्यांनी आयसीसीला नकारात्मक अहवाल का पाठिवला नव्हता?

टॅग्स :ऑफ द फिल्ड
Open in App