मुंबई : चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना 'देश सोडण्याचा' सल्ला देणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली वादात अडकला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) त्याची चांगलीच कानउघडणी केली होती. यातून धडा घेत प्रशासकीय समितीने कोहलीला ताकीद दिली असल्याचे समजते. प्रसारमाध्यम आणि चाहत्यांशी नम्रतेने वागण्याचा सल्ला प्रशासकीय समितीने त्याला दिला आहे.
(विराट कोहली म्हणतो, मी माफी मागणार नाही...)
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. 21 नोव्हेंबरला ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. मालिकेला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने कोहलीशी व्हॉट्सअॅपवर चर्चा केली आणि त्याला प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी ताकीद देण्यात आली आहे. भारतीय कर्णधारपदाला साजेसे वर्तन कर, असा सल्लाही समितीने दिला.